Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा आज 79 वा वाढदिवस. अमिताभ यांचे चाहते त्यांना सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अमिताभ यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये 11 ऑक्टोबर 1942 रोजी झाला. बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशात देखील अमिताभ यांचे चाहते आहेत. अमिताभ यांना इंजिनिअर होऊन एअरफोर्समध्ये जायचे होते. पण नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
7 नोव्हेंबर 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सात हिन्दुस्तानी' चित्रपटातून अमिताभ यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्वाजा अहमद यांनी केले होते. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अमिताभ यांना 5 हजार रूपये मानधन मिळाले होते. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे 12 चित्रपट प्लॉप झाले होते. बिग बींना त्यांच्या आवाजामुळे 'ऑल इंडिया रेडियो'ने देखील रिजेक्ट केले होते. त्यानंतर 'जंजीर' या चित्रपटातील अभिनयामुळे अमिताभ यांना विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकोर्ड्स तोडले. त्यानंतर मात्र अमिताभ यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला.
अमिताभ यांच्या अभिनयाला आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये अमिताभ यांनी काम केले आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. दादासाहेब फाळके, पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांचे अमिताभ बच्चन हे मानकरी ठरले आहेत. तसेच त्यांना तीन वेळा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि 16 वेळा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहे. अमिताभ यांनी प्लेबॅक सिंगर आणि फिल्म प्रोड्यूसर म्हणून देखील काम केले आहे. 2015 साली फ्रान्स सरकारने त्यांना 'सम्मान नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनरने' गौरवले.