मुंबई : पद्मावती चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणसोबतच रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या व्यक्तिरेखांबाबतही चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. अल्लाउद्दिन खिल्जीची भूमिका अभिनेता रणवीर सिंगपूर्वी अजय देवगनला ऑफर झाल्याच्या चर्चांना उत आला आहे. मात्र यात काहीही तथ्य नसल्याची माहिती आहे.


अजय देवगनला पद्मावती सिनेमात कुठल्याही व्यक्तिरेखेची ऑफर देण्यात आली नव्हती, खिल्जीच्या भूमिकेसाठी रणवीरच भन्साळींची पहिली चॉईस होता. मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी बाजीराव मस्तानीसाठी अजयचा विचार केला होता. बाजीराव साकारण्यासाठी रणवीरपूर्वी अजयला विचारणा झाली होती.

हम दिल दे चुके सनम नंतर पुन्हा एकदा अजय देवगनसोबत काम करण्यास भन्साळी उत्सुक होते, मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत, असं 'डेक्कन क्रॉनिकल'मधील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. बाजीरावांच्या भूमिकेसाठी अजयने अवाढव्य रक्कम मागितल्याचं म्हटलं जातं.

पद्मवती चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडथळे अद्याप दूर झालेले नाहीत. सिनेमा कधी रीलिज होणार, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचं आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेसह काही राजपूत संघटनांनी विरोध केला आहे. 1 डिसेंबर रोजी नियोजित पद्मावती सिनेमाचं प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.