मुंबई : नोटाबंदी हा केंद्र सरकारने घेतलेला चांगला निर्णय असून प्रत्येक नागरिकाने त्यांना पाठिंबा द्यायला हवा, असं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं आहे. दंगल चित्रपटाच्या रिलीजच्या तोंडावर आमीर खानने पंतप्रधानांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.


मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ख्याती असलेल्या आमीरने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. चलनतुटवड्यामुळे सामान्य माणसांचे हाल होत असल्याबाबत मात्र आमीरने खंत व्यक्त केली आहे.

'माझ्याकडे काळा पैसा नाही, मी सर्व कर वेळेत भरतो. त्यामुळे मला फारसा त्रास झालेला नाही. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांना समस्यांना तोंड द्यावं लागत असेल. मी खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबीट कार्डचा वापर करतो' असं आमीर खानने सांगितलं.

कॅशलेस म्हणजेच डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी आशाही आमीरने व्यक्त केली. मी काही अर्थतज्ज्ञ नाही, पण एखादी व्यक्ती चांगलं काम करत असेल, तर आपण त्यांची मदत करायला हवी, असं मतही त्याने व्यक्त केलं.

गेल्या वर्षी आमीरने आपल्या पत्नीला देशात असुरक्षित वाटत असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यानंतर आमीर आणि किरण राव यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली होती. त्यानंतर आता आमीरने पंतप्रधानांना पाठिंबा दिला आहे.

पैलवान महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित 'दंगल' चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. तर 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटात त्याचा स्पेशल अपियरन्स असून आदित्य चोप्राच्या 'ठग्स ऑफ हिंदुस्तान'मध्ये आमीर बिग बींसोबत झळकणार आहे.