मुंबईः खिलाडी अक्षय कुमारने 2016 मध्ये 'एअरलिफ्ट', 'हाऊसफुल 3' आणि या स्वातंत्र्य दिनाला रलीज झालेल्या 'रुस्तम'च्या यशानंतर खिलाडी असल्याचं सिद्ध केलं आहे. मात्र 2017 मध्येही अशीच कमाल पाहायला मिळेल का, याबाबत चर्चा सुरु आहे. कारण 2017 च्या स्वातंत्र्य दिनाला बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि किंग खान शाहरुख या दोघांची टक्कर होण्याची शक्यता आहे.
नीरज पांडे दिग्दर्शित 'क्रॅक' सिनेमा पुढील स्वातंत्र्य दिनाला रिलीज होणार असल्याचं अक्षयने यापूर्वीच जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे शाहरुखही 2017 च्या स्वातंत्र्य दिनालाच त्याचा आगमी 'दी रिंग' सिनेमा रिलीज करण्याच्या तयारीत आहे. इम्तियाज अली यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
शाहरुखचं 2017 साठी जम्बो प्लॅनिंग
शाहरुखचं 2017 मध्ये तीन सिनेमे रिलीज करण्याचं नियोजन आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच 'रईस' रिलीज होणार आहे. याच दिवशी हृतिक रोशनचा 'काबिल' सिनेमा रिलीज होत आहे. त्यामुळे शाहरुखचा 'द रिंग' स्वातंत्र्य दिनाला रिलीज करण्याचं नियोजन असल्याची माहिती आहे. शिवाय दिग्दर्शक आनंद एल. राय यांचं दिग्दर्शन असणारा शाहरुखचा एक सिनेमाही 2017 च्या शेवटी रिलीज होण्याची शक्यता आहे.
आता पर्यंत कधी-कधी अक्षय विरुद्ध शाहरुख?
यापूर्वी शाहरुखचा 'चेन्नई एक्स्प्रेस' आणि अक्षयचा 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' यांची बॉक्स ऑफिसवर 2013 मध्ये टक्कर होणार होती. मात्र चर्चा केल्यानंतर 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा' ची रिलीज डेट एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली. मात्र शाहरुखचा 'डॉन' आणि अक्षयचा 'जान ए मन' यांची बॉक्स ऑफिसवर स्पर्धा रंगली. त्यामुळे आता यावेळी कोणी माघार घेणार का, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.