मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या नावाने सध्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. केंद्र सरकारने सैन्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी आणि शहीदांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी एक बँक खातं उघडलं आहे. या खात्यात तुम्ही एक रुपयापासून तुमच्या मर्जीप्रमाणे कितीही रक्कम जमा करु शकता. हा निर्णय मास्टर स्ट्रोक असल्याचं म्हटलं जात आहे, असा मेसेज फिरत आहे.
जर तुम्हालाही कोणी व्हॉट्सअॅपवर हा मेसेज फॉरवर्ड केला असेल तर थांबा. कारण हा मेसेज पूर्णत: बनावट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अक्षय कुमार फक्त भारत सरकारच्या bharatkeveer.gov.in या वेबसाईटशी संलग्न आहे. पण अक्षयने कोणत्याही अकाऊंटमध्ये पैसे जमा करण्याचं आवाहन केलेलं नाही.
या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, "भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी 70 टक्के लोकांनी केवळ एक रुपया जरी या फंडमध्ये जमा केला, तर एका दिवसात ती रक्कम 100 कोटी होईल. 30 दिवसांमध्ये 3000 कोटी आणि 36000 कोटी एका वर्षात. पाकिस्तानचा संरक्षणावरील वर्षाचा बजेटही 36,000 कोटी रुपये नाही. आपण 100 किंवा 1000 रुपये दररोज अनावश्यक कामात खर्च करतो. पण जर आपण एक रुपया सैन्यासाठी दिला, तर खरंच भारत एक शक्तिशाली देश बनेल. तुमचा हा रुपया थेट संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक सहाय्यता तसंच युद्ध अपघात निधीत जमा होईल. ही रक्कम सैन्याच्या सामग्री आणि जवानांच्या कामी येईल.'
काही महिन्यांपूर्वी अक्षय कुमारने सुकमा नक्षलवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. ऑडिओ मेसेजमध्ये अक्षय म्हणाला होता की, "नुकतंच सुकमा हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांनी देशासाठी आपले प्राण दिले होते. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की, जर तुम्हाला या शहीदांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर भारत सरकारच्या bharatkeveer.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमचं योगदान द्या. जेणेकरुन शहीदांच्या कुटुंबीयांना जाणवेल की, या दु:खाच्या क्षणात संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे. ते एकटे नाहीत."