मुंबई : सत्य घटनांवर आधारित स्पेशल 26, एअरलिफ्ट, रुस्तमसारखे चित्रपट असो किंवा बेबी, हॉलिडे सारखे दमदार सिनेमा. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून काम करण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. बायोपिकपासून दूर राहिलेला अक्षय आता मात्र चक्क दोन चरित्रपटात झळकणार आहे.


ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार आहे. अरुणाचलम मुरुगंथा यांची भूमिका अक्षय साकारणार असून हा चित्रपट त्याची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्नाचीच निर्मिती आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.

अभिनेत्री ट्विंकल खन्ना मासिक पाळीवर लेख लिहिण्यासाठी संशोधन करत असताना तिला अरुणाचलम मुरुगंथा यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर काल्पनिक गोष्टीच्या आधारे तिने ही सत्य घटना आपल्या आर्टिकलमध्ये मांडली होती. आता पुस्तकातील लेखापासून चित्रपटापर्यंतचा हा प्रवास होत आहे.

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चिनी कम, पा, शमिताभ सारख्या चित्रपटांचे गाजलेले दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या खांद्यावर आहे. ट्विंकलची फक्त संकल्पना असून लेखनही बाल्कीच करतील.