Akshay Kumar Sky Force Movie : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या स्काय फोर्स चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमारचा स्काय फोर्स चित्रपट 24 जानेवारीला प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एक बायोपिक आहे. गेल्या काही वर्षात अक्षय कुमारने अनेक बायोपिकमध्ये काम केलं आहे. याबद्दल एका मुलाखतीत बोलताना त्याने इतिहासाच्या पुस्तकातील अभ्यासक्रम बदलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अक्षय कुमारने स्काय फोर्स चित्रपटात एका एअर फोर्स ऑफिसरची भूमिका साकारली आहे.
अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' चित्रपट रिलीज
स्काय फोर्स चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील सत्य घटनेवर प्रकाश टाकण्यात आलं आहे. 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानच्या सरगोधा एअरबेसवरील भारताच्या प्रतिहल्ल्याची कहाणी सांगण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार विंग कमांडर केओ अजुहा यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून वीर पहारिया बॉलिवूड डेब्यू करत आहे.
अनेक बायोपिकमध्ये काम
गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारने अनेक बायोपिकमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये अक्षय कुमारने पहिल्या बायोपिकमध्ये काम केलं, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'पॅडमॅन' चित्रपटात अक्षय कुमारने लक्ष्मीकांत चौहानची भूमिका साकारली. यानंतर त्याने 'गोल्ड' (2018), 'केसरी' (2019), 'सम्राट पृथ्वीराज' (2022), 'मिशन राणीगंज' (2023), 'सरफिरा' (2024) आणि आता 'स्काय फोर्स' सारख्या बायोपिकमध्ये काम केलं आहे.
अक्षय कुमारने सांगितलं बायोपिकमध्ये काम करण्याचं कारण
अक्षय कुमारने सांगितलं की, तो असे चित्रपट करतो जे शाळेतील पाठ्यपुस्तकांचा भाग असायला हवे होते. अक्षय कुमार न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, "अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पुस्तकात नाहीत. मी मुद्दाम अशा भूमिका करतो, ज्या आपल्या पुस्तकांचा भाग नाहीत. जेणेकरून लोकांना त्या सर्व अज्ञात नायकांबद्दल माहिती मिळेल, म्हणून मी अशा भूमिका निवडतो".
"इतिहासाची पुस्तके सुधारण्याची गरज"
अक्षय कुमारने मुलांच्या इतिहासाच्या पुस्तकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यामध्ये बदलाची गरज असल्याचं म्हटलं आहे. यावेळी तो म्हणाला की, "शाळेच्या पुस्तकातील बऱ्याच गोष्टी दुरुस्त करायला हव्यात. आपण अकबर किंवा औरंगजेबाबद्दल वाचतो, पण आपल्या देशातील नायकांबद्दल वाचत नाही. त्यांची माहिती देणे महत्वाचे आहे. परमवीर चक्र किती लोकांना देण्यात आलं आहे? भारतीय सैन्याबद्दल अनेक कथा आहेत. मला वाटतं इतिहास दुरुस्त करायला हवा आणि अशा नायकांना पुढे आणून त्यांच्याबद्दल आपल्या पिढीला सांगायला हवं".
महत्त्वाच्या इतर बातम्या :