मुंबई : अक्षय कुमारचा सिनेमा 'पॅडमॅन' जबरदस्त प्रमोशनसह 9 फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाविषयी अनेकांना बरीच उत्सुकता होती. अशावेळीच या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.


पहिल्या दिवसाचं कलेक्शन आणि सिनेमाबाबत मिळालेल्या प्रतिक्रिया पाहता या सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्विटरवरुन पॅडमॅनच्या पहिल्या दिवसाची कमाई जाहीर केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल 10.26 कोटीची कमाई केली आहे.


पहिल्याच दिवशी एवढंच चांगल ओपनिंग मिळाल्याने हा सिनेमा पुढील दोन दिवसातही जबरदस्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हा सिनेमा सॅनिटरी नॅपकिनविषयी जागरुकतेवर बेतला आहे. या सिनेमाचं प्रमोशनंही अनोख्या पद्धतीने करण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूडमधील एकाहून एक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता.

‘पॅडमॅन’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. स्वस्त दरात सॅनिटरी पॅड तयार करणारे कोईंबतूरचे अरुणाचलम मुरुगननाथम यांच्या जीवनाशी प्रेरित या सिनेमाचं कथानक आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅड बनवणाऱ्या अरुणाचलम् या युगपुरुषाच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसणार आहे.

ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देणं, हे अरुणाचलम यांचं उद्दिष्ट होतं. मासिक पाळीत अरुणाचलम यांच्या गावातील तसंच समाजातील महिला चिंध्यांसारख्या अनारोग्यदायी वस्तू वापरत असत. बाजारातील सॅनिटरी नॅपकिन महागडे असल्यामुळे अरुणाचलम यांनी आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वस्त सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन दिले.

दरम्यान, अक्षय आणि सोनम एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोघांनी 2011मध्ये ‘थँक्यू’ या सिनेमात काम केलं होतं. तर राधिका आपटे पहिल्यांदाच अक्षय कुमारसोबत काम करणार आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन आर. बाल्की करत असून, निर्मितीची जबाबदारी अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नाने घेतली आहे.

संबंधित बातम्या :

... म्हणून नेहमी सामाजिक विषयांवर सिनेमा बनवतो : अक्षय कुमार


अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'चा ट्रेलर रिलीज