Akshay Kumar On Manipur Violence: मणिपूरमधील (Manipur) एका घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. दोन महिलांची भररस्त्यात विवस्त्र धिंड काढण्यात आली. मणिपूरची राजधानी इंफाळपासून 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. देशामधील अनेक राजकीय नेत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मणिपूरमध्ये घडलेल्या या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आता अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) एक ट्वीट शेअर करुन मणिपूरमध्ये घडलेल्या या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय कुमारनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून हादरलो. दोषींना एवढी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणीही असे भयानक कृत्य करण्याचा विचारही करणार नाही, अशी मी आशा व्यक्त करतो.' अक्षयनं शेअर केलेल्या या ट्वीटला रिप्लाय करुन अनेकांनी मणिपूरमधील या भयानक घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
अक्षयसोबतच रेणूका शहाणे, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा या कलाकारांनी देखील ट्वीट शेअर करुन मणिपूरमधील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे.
कंगपोकपी जिल्ह्यात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना 4 मे रोजीची असल्याची माहिती आहे.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिजिनियस ट्रायबल लीडर फोरमने (ITLF) म्हटले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका समुदायाच्या जमावाने दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली असून शेतात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केला. या घटनेचा संपूर्ण देशामधून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेवर सरकार आणि विरोधक दोन्ही नाराज असल्याने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा मागण्याची शक्यता आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: