मुंबई : मुंबईतील अंधेरीत राहणारी 19 वर्षीय श्रेया नाईक सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. "मला तुझा अभिमान वाटतो" असं म्हणत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने श्रेयाचं कौतुक केलं आहे. कोण आहे श्रेया नाईक, तिने असं काय केलं आहे, ज्यामुळे अक्षय कुमारलाही तिची दखल घ्यावीशी वाटली.


 

श्रेया नाईक ही मुंबईतील अंधेरीत राहणारी 19 वर्षीय तरुणी. तिने एक असं धाडसाचं काम केलं, जे इतर मुलींनाही प्रेरणादायी ठरेल. तिच्या या धाडसाची थेट बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारनेही दखल घेतली आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

 

श्रेयानं काय केलं?

 

श्रेयाला एकटी पाहून एका टवाळखोर तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. मात्र, श्रेयाने त्याला न घाबरता धडा शिकवला. इतकंच नव्हे, त्या टवाळखोराला पोलिसांच्या ताब्यातही दिलं. आता अशा तरुणीचा अक्षयलाच काय संपूर्ण देशाला अभिमान वाटायला हवा. पण श्रेयाने हे धाडस दाखवण्याचं श्रेय जातं ते अक्षय कुमार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना.

https://twitter.com/akshaykumar/status/719831690206535680

दिल्लीत निर्भया प्रकरण झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने आदित्य ठाकरेंना सोबत घेऊन वुमन्स सेल्फ डिफेन्स सेंटर सुरु केलं होतं. या सेंटरद्वारे महिला आणि मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण दिलं जातं. अनेक महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे श्रेया नाईकही याच डिफेन्स ट्रेनिंग सेंटरमधील विद्यार्थिनी आहे. त्यामुळे अक्षय कुमारने श्रेयाच्या धाडसाची दखल घेत तिचं कौतुक केलं आहे.

 

गैरवर्तन करणाऱ्या टवाळखोराला धडा शिकवत पोलिसांच्या ताब्यात देण्याचं धाडस करणारी श्रेया नाईक सांगते, "मी माझ्या घराच्या दिशेने जात होती. त्यावेळी वेटरच्या वेशात असलेला एक तरुण माझ्यासमोर आला आणि मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागला. मी एका हाताने त्याला मारलं आणि दुसऱ्या हाताने मोबाईलवरुन आईला फोन लावला."

 

"तो तरुण माझ्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, मी पूर्ण ताकद पणाला लावत त्याला तरुणाचा विरोध करत आईला फोन लावला. त्यानंतर आजूबाजूचे काही लोक माझ्या मदतीला आले. 'मी फक्त हातच तर लावला आहे' असं तो तरुण म्हणू लागला. त्यानंतर तो तिथून पळण्याच्या बेतात असताना मी त्याला पकडून ठेवलं आणि पोलिसांच्या हवाली केलं."

 

अंधेरीतील डीएन नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला असून लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे. तरुणीला घाबरण्याचं कारण नसल्याचं डीएन नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नलावडे यांनी सागंतिले.