ट्विंकलचं ट्वीट आणि प्रतिक्रिया
ट्विंकल खन्नाने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात फोटो पोस्ट करुन लिहिलं होतं की, "गुड मॉर्निंग, टॉयलेट: एक प्रेमकथा 2 चा हा पहिला सीन असेल, असं मला वाटतंय."
अनेकांनी ट्विंकलचं हे ट्वीट रिट्वीट केलं होतं. काहींनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर काहींना तिची पोस्ट आवडली नव्हती. ट्विंकल गरिबांविषयी असंवेदनशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. "जे लोक झोपडपट्टीत राहतात, त्यांच्याकडे सार्वजनिक शौचालय नसल्याने, त्यांना उघड्यावर शौचास जाण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो," अशी प्रतिक्रिया काहींनी दिली होती.
तर जुहू, वर्सोवा बीच शौचमुक्त होतील!
"अक्षय कुमारने दिलेल्या मदतीमुळे या समस्येचं अशंत: निराकरण झालं आहे. अशा प्रकारच्या 3 किंवा 4 टॉयलेटची व्यवस्था करायला हवी, जेणेकरुन जुहू आणि वर्सोवा बीच शौचमुक्त होऊ शकतील," असं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
बायो-टॉयलेटसाठी दहा लाखांचा खर्च
अक्षय कुमारने युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबतीने जुहू बीचवर टॉयलेटची व्यवस्था केली आहे. यासाठी त्याने दहा लाख रुपये खर्च केले आहेत. या टॉयलेटमध्ये सहा सीट असून ज्यात तीन महिलांसाठी आणि तीन पुरुषांसाठी आहेत. तर मुतारीसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
लोकांना मोठा दिलासा
के-पश्चिम प्रभागाचे सहाय्यक महापालिका आयुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले की, "या टॉयलेटमध्ये बायो-डायजेस्टर आहे, ज्यामुळे इथे दुर्गंध पसरणार नाही. या टॉयलेटमुळे केवळ झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांनाच नाही तर चौपाटीवर फिरायला येणाऱ्या लोकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे."