Akshay Kumar Bollywood : मागील काही काळापासून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाही. अक्षय कुमारचे चित्रपट ओळीने फ्लॉप ठरत असल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका संबंधितांना सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे अक्षय कुमारचा फ्लॉप झालेला एक चित्रपट पाकिस्तानमध्ये हिट ठरला आहे.
भारताचा शेजारचा देश असलेला पाकिस्तानमध्ये बॉलिवूड चित्रपटांचा एक चाहता वर्ग आहे. भारतीय चित्रपट, कलाकारांचे चाहते पाकिस्तानमध्येदेखील आहे. त्यामुळे काही भारतीय चित्रपटांनी पाकिस्तानमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकले नाही. त्यामुळे प्रोडक्शन हाऊसचे मोठे नुकसान झाले.तर, अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत आणखी एका फ्लॉप चित्रपटाचे नाव जोडले गेले. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे. ओटीटीवरील टॉप 10 चित्रपटाच्या यादीत अक्षय कुमारच्या या चित्रपटाचा समावेश फक्त भारतात नसून पाकिस्तानमध्येदेखील आहे.
OTT प्लॅटफॉर्म Netflix च्या साप्ताहिक टॉप 10 च्या यादीत अक्षय कुमारचा ''बडे मियाँ छोटे मियाँ'' हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे. ही यादी 16 जून ते 23 जून या आठवड्यांसाठी आहे. यावरून अक्षय कुमारच्या चित्रपटाला पाकिस्तानमध्ये खूप प्रेक्षक मिळत आहेत. अक्षय कुमारचा हा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट 250 ते 300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. या चित्रपटाने 100 कोटींच्या घरात कमाई केली होती.
अक्षय कुमारचा बॅडपॅच...
अक्षय कुमारने मागील 25 महिन्यांमध्ये एकूण 8 सिनेमे केले. त्यापैकी फक्त एकच सिनेमा त्याचा हिट ठरला. त्यामुळे तो सध्या करिअरच्या एका कठीण टप्प्यातून जात असल्याचे चित्र आहे. मागील काही काळापासून बॉक्स ऑफिसशी त्याचा काही मेळ जमत नसल्याचं चित्र आहे. त्यासाठी तो अनेक प्रयत्न करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. वेगळ्या आशयाच्या सिनेमांमधून मागील काही काळात अक्षय दिसला. तो नेहमीप्रमाणे वर्षाला 4 ते 5 सिनेमे देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. पण त्याचे चित्रपट काही केल्या हिट होत नाही.
अक्षय कुमारचे चित्रपट फ्लॉप होण्यास 18 मार्च 2022 पासून सुरुवात झाली.तेव्हा त्याचा बच्चन पांडे रिलीज झाला. 180 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट केवळ 75 कोटींची कमाई करू शकला. यानंतर 2022 मध्येच त्यांचा सम्राट पृथ्वीराज रिलीज झाला होता. हा एक बिग बजेट चित्रपट होता. त्यात मोठी स्टारकास्ट होती. पण हाही चित्रपट फ्लॉप झाला.