Mumbai Lok Sabha Election Akshay Kumar :   देशभरात आज लोकसभा निवडणुकीसाठीचे पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडत आहे.  या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 जागांसाठी मतदान पार पडत आहे. मुंबईकरांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून येत असून अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारांनीदेखील सकाळी सकाळी मतदानाचा अधिकार बजावला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने  आपला मतदानाचा अधिकार बजावला. भारताचे नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केले आहे. 
 
जवळपास महिनाभर प्रचार झाल्यानंतर आज मतदान होत आहे. नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला पाहिजे यासाठी कलाकारांनी आवाहन केले आहे. भल्या भल्या सकाळी उठून वर्क आऊट आणि आपल्या शूटिंगच्या शेड्युल्डसाठी ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारनेही जुहू  येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर  अक्षय कुमारने पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, मुंबईकर मतदानाच्या प्रक्रियेत उत्साहाने सहभाग घेतील. आज सकाळी-सकाळी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दिवसभरात चांगले मतदान होईल असा विश्वास अक्षय कुमारने व्यक्त केला.


भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदान


अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व सोडून पुन्हा एकदा भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यानंतर आज त्याने पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावला. भारतीय नागरिक म्हणून मतदानाचा अधिकार बजावल्याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया अक्षय कुमारने व्यक्त केली. 






अभिनेत्री जान्हवी कपूरने बजावला मतदानाचा अधिकार


अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. जान्हवी कपूरने वांद्रे येथील सेंट एन्स हायस्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर जान्हवी कपूर आगामी चित्रपट 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसी येथे जाणार आहे.


किंग खानकडून मतदान करण्याचे आवाहन... 


बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. शाहरुखचा सोशल मीडियावर (Social Media) मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्याने बोटाला शाई लागण्याआधी आपल्या चाहत्यांना आणि मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मतदान करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, असं म्हणत शाहरुखने चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.   भारत देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या सोमवारी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. भारतीय नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडुया आणि देशाचे हित जाणून घेऊन मतदान करूया. मतदान करण्याचा प्रचार करा, असे आवाहनही शाहरुख खानने केले  आहे.