मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या बहुप्रतीक्षित सूर्यवंशी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्विटर हॅण्डलवर चित्रपटाचा टीझर ट्वीट केला आहे. 24 मार्च रोजी संध्याकाळी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होत आहे.


सूर्यवंशीचा 58 सेकंदाचा हा टीझर अतिशय हटके आहे. या टीझरमधून चित्रपटगृह आता 24 तास सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे. टीझरमध्ये सिंबा म्हणजेच रणवीर सिंह, बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगणही दिसत आहेत. रोहित शेट्टी हा चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.





मुंबईतील चित्रपटगृह 24 तास खुले राहणार
चित्रपटाच्या टीझरमध्ये सांगण्यात आलं आहे की, "येत्या 24 मार्चच्या संध्याकाळपासून मुंबईतील सर्व चित्रपटगृह 24X7 खुले राहणार आहेत. त्यामुळे आता आपले आवडते चित्रपट कधीही पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे 25 तारखेला गुढीपाडव्याची सुट्टी आहे. त्यामुळे टीम सूर्यवंशी 24 मार्चच्या संध्याकाळीच हा चित्रपट प्रदर्शित करणार आहे."


रोहित शेट्टीचा 'कॉप जॉनर'चा नवा चित्रपट
'सूर्यवंशी' हा चित्रपट रोहित शेट्टीच्या कॉप जॉनरचा नवा सिनेमा आहे. 'सिंघम'मध्ये अजय देवगन आणि 'सिंबा'मध्ये रणवीर सिंहला पोलिसाच्या भूमिकेत सादर केल्यानंतर आता त्याने अक्षय कुमारला पसंती दिली आहे. 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयशिवाय अजय आणि रणवीरही दिसतील. कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.


खरंतर हा चित्रपट 'ईद'ला प्रदर्शित होणार होता. परंतु सलमान खानच्या चित्रपटासोबत टक्कर होऊ नये यासाठी प्रदर्शनासाठी दोन महिने आधीची तारीख निश्चित करण्यात आली.