प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, सैराटमध्ये परशा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आकाश ठोसरची ‘एफयू’मध्येही मुख्य भूमिका असणार आहे. 2 जून रोजी आकाशचा हा नवा सिनेमा रिलीज होणार आहे.
अभिनेता आकाश ठोसरच्या सैराटमधील भूमिकेमुळे त्याच्या पुढच्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर महेश मांजरेकरांच्या ‘एफयू’मधून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’मधून आकाश ठोसर महाराष्ट्रासह देशभर पोहोचला. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडनेही सैराट आणि त्यातील कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं होतं.
वेगवेगळे विषय घेऊन सिनेमे करणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. तर दुसरीकडे आकाश ठोसरने आतापर्यंत फक्त एकाच सिनेमात म्हणजे ‘सैराट’मध्येच काम केलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर आकाशला कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणणार आहेत, याची सिनेरसिकांसह चित्रपटसृष्टीलाही उत्सुकता लागली आहे.