मुंबई : अभिनेता अजय देवगन सध्या ओम राऊतच्या 'तानाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हा सिनेमा शिवरायांच्या स्वराज्यात ज्यांचा 'सिंहा'चा वाटा होता, त्या तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. या सिनेमातील अजय देवगनचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे.


तानाजी : द अनसंग वॉरिअर सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊतने आपल्या ट्विटरवर अजय देवगनचा सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या फोटोत अजय देवगन हातात तलवार घेऊन शिवरायांच्या खऱ्या योद्ध्याप्रमाणे दिसत आहे. सिनेमाची शूटिंग सप्टेंबर 2018 मध्ये सुरु झाली असून सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





याआधी सिनेमाचं एक पोस्टर समोर आलं होतं. मात्र या पोस्टरमध्ये अजय देवगन स्पष्ट दिसत नव्हता. पोस्टरमध्ये तानाजी मालुसरे ढालीच्या साहाय्याने स्वरक्षण करताना दाखवले होते.


सिनेमात अजय देवगनसोबत सैफ अली खान, काजोल, सुनील शेट्टी, पंकज त्रिपाठी हे कलाकार झळकणार आहेत. सैफ अली खान औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. काजोल लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर सुनील शेट्टी मिर्झा राजा जय सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सलमान खान शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचं बोललं जात आहे.


सिंहगडाची लढाई


तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी सिंहगड ताब्यात घेण्याचा विचार सांगितला. परंतु तानाजींच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते. मात्र तानाजींनी स्वतःहून प्रेरित होऊन शिवाजींना या लढाईचं नेतृत्व आपल्याला देण्यास सांगितलं. तानाजी जिवंत असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही. आधी लगीन कोंढाण्याचे, मगच रायबाचे असे तानाजींचे उद्गगार प्रसिद्ध आहेत.


तानाजी मालुसरेंनी या युद्धात बलिदान दिल्याचं शिवाजी महाराजांना समजलं, तेव्हा महाराजांना याचं अतिव दु:ख झालं आणि त्यांच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं, 'गड आला पण सिंह गेला'. त्यानंतर या गडाचं नाव कोंढाणावरुन 'सिंहगड' असं बदललं.