मुंबई : बॉलिवूड आणि विशेषत: दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


नववर्षाच्या सुरूवातीला आपण 2019 ची निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केले आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक न लढवता आपण अपक्ष ही निवडणूक लढणार असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कलाकारांची आणि विचारवंताची समाजात होणाऱ्या गळचेपीवरही त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली होती.


मी हिंदूविरोधी नाही, फक्त मोदीविरोधी आहे, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते. मारेकऱ्यांचं समर्थन करणारा कुणीही व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणवून घेऊ शकत नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मोदी समर्थकांनी सेलिब्रेशन केलं. त्यावेळीही मोदींनी प्रतिक्रिया दिली नाही. एक खरा हिंदू कधीच अशा हत्यांचे समर्थन करणार नाही.”, असे प्रकाश राज यांनी म्हटले होते.

प्रकाश राज यांनी अनेकदा सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे.   "मैने मांगा राशन, उसने दिया भाषण." या मिमच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली होती. मोदी खोटे बोलतात, मीडिया खोट्या बातम्या पसरवते, मोदींच्या पक्षाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात, त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, असेही ते म्हणाले होते.

कर्नाटक निवडणुकीच्या आधी तिथे कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात भाजपची सत्ता येणार नाही, आल्यास ती कर्नाटकातल्या नागरिकांची घोडचूक असेल असं वक्तव्य प्रकाश राज केले होते. शिवाय मी काँग्रेसच्या समर्थनात नसून भाजपच्या विरोधात आहे असंही मत त्यांनी मांडले होते.