'ट्युबलाईट'नंतर सलमान-शाहरुख मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र?
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2017 10:58 AM (IST)
मुंबई : शाहरुखसोबत पूर्ण लांबीचा चित्रपट करण्याचा कुठलाही इरादा नसल्याचं सलमानने सांगितल्यामुळे दोघांचे चाहते काहीसे हिरमुसले होते. सलमानच्या ट्युबलाईटमध्ये शाहरुखने कॅमिओ केल्यानंतर आता शाहरुखच्या सिनेमातही सलमान दिसण्याची शक्यता आहे. आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यातच सलमान पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावण्याची शक्यता आहे. 'या चित्रपटात सलमानने कॅमिओ करावा अशी माझी इच्छा आहे. याबाबत अद्याप बोलणी सुरु आहेत.' असं शाहरुख म्हणाला. आनंद राय यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ठरलं नसून शाहरुख यात एका बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ ही 'जब तक है जान'मधली त्रयी एकत्र दिसणार आहे. कतरिना या चित्रपटात 'कतरिना कैफ'चीच भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे सलमानसोबत तिची जोडी दिसण्याची चिन्हं आहेत. यापूर्वी करण-अर्जुन, कुछ कुछ होता है, हम तुम्हारे है सनम यासारख्या चित्रपटांमध्ये शाहरुख आणि सलमान यांनी स्क्रीन शेअर केली आहे.