Hardik Pandya Natasa Stankovic : टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिच ( Natasa Stankovic) यांनी काही दिवसांपूर्वीच काडीमोड घेत असल्याची अधिकृत घोषणा केली. हार्दिक पांड्या सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत व्यस्त असून दुसरीकडे नताशा ही आपल्या मायदेशी सर्बिया येथे मुलगा अगस्त्यसोबत आहे. घटस्फोटाची अधिकृत घोषणा करण्याआधीच नताशा ही सर्बियामध्ये गेली.
नताशा ही सर्बियामध्ये मुलगा अगस्त्य सोबत चांगला वेळ घालवत आहे. नताशा आपल्या मुलासोबत मस्ती करतानाचे फोटो रोज शेअर करत असते. विभक्त झाल्यानंतर नताशा आणि हार्दिक त्यांचा मुलगा अगस्त्य सह-पालक होणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली होती. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने पालकत्वाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
नताशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पालकत्वाशी निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. नताशाने या पोस्टनंतर अगस्त्यचा चित्र काढतानाचा फोटो शेअर केला आहे.
नताशाची पोस्ट व्हायरल...
नताशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,''तुमच्या मुलांसोबत कठोर होऊ नका. कारण जग हे एक कठीण ठिकाण आहे. हे खरे प्रेम नाही. जेव्हा ते तुमच्यासाठी जन्म घेतात तेव्हा तुम्ही त्यांचे जग असता आणि त्यांच्यावर प्रेम करणे तुमचे काम असते.''
अगस्त्य सोबत शेअर केले फोटो...
नताशाने नुकतंचे आपला मुलगा अगस्त्यला डायनासोर पार्कमध्ये फिरायला घेऊन गेली होती. नताशाने या आऊटिंगचे अनेक फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते. या पोस्टवर हार्दिकने हार्ट इमोजी पोस्ट केली होती.
हार्दिक आणि नताशा यांनी 2022 मध्ये अचानकपणे लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर नताशा ही गरोदर असल्याची घोषणा करण्यात आली. हार्दिक आणि नताशा यांनी वर्ष 2023 मध्ये ग्रँड वेडिंग केली होती. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. हार्दिक आणि नताशा यांच्या लग्न सोहळ्यात अगस्त्यदेखील सहभागी झाला होता.