'राजपूत घराण्याची आदर्श राणी पद्मावती यांच्या आयुष्यावर आधारित 'पद्मावती' नावाचा चित्रपट लवकरच येत आहे. यामध्ये राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यावरील काही प्रसंगांचं चित्रीकरण करताना जयपूरच्या किल्ल्यात करणी सेना नावाच्या राजपूत संघटनेने भन्साळींना धडा शिकवला. भारतीयांच्या पैशावर कोट्यवधी कमवून माज दाखवणाऱ्या, आलिशान गाड्यांमध्ये फिरणाऱ्या बॉलिवूडवाल्यांना जनतेने जागा दाखवली आहे. सिनेमा आणि कलेच्या नावाखाली हिंदूंच्या शौर्याच्या इतिहासाचं विकृतीकरण करणं कधीही खपवून घेतलं जाणार नाही, हे जनतेनं दाखवून दिलं' असं हिंदू जनजागृती समितीने म्हटलं आहे.
'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटात मथुरेतील काही परंपरांचा अपमान केल्याचा आरोप करत मथुरावासियांनी सिनेमाला विरोध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर, हिंदू परंपरांचा अनादर करु नका, हा धडा 'टॉयलेट..' च्या निर्माते-दिग्दर्शकांनी घ्यावा, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने एका पत्राच्या माध्यमातून दिला आहे.
ऐतिहासिक महापुरुषांना काही समाजांमध्ये विशिष्ट स्थान असतं. त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांमध्ये बदल करुन फिल्मी मसाला टाकला किंवा काही प्रसंग जोडले तर त्याला विरोध होणं स्वाभाविक आहे, असं सांगताना यापूर्वी जोधा-अकबर, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांच्या वेळीही विरोध झाल्याचं हिंदू जनजागृती समितीने म्हटलं आहे.
कुठलाही मसाला न टाकता ऐतिहासिक किंवा पारंपरिक संदर्भ असलेलेच प्रसंग दाखवावेत, असं लेखी पत्र दिलंत तरच हिंदू समाज मोकळ्या मनाने त्या चित्रपटांना स्वीकारेल, मात्र दगा दिल्यास रोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीने पत्रात दिला आहे.
जयपूरमधील जयगडमध्ये सुरु असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला.
चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने हल्ला केला.
'अक्षयच्या 'टॉयलेट'च्या दिग्दर्शकाची जीभ कापा, 1 कोटी मिळवा'
'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटात नंदगाव आणि बरसाना गावातील तरुण-तरुणीचं लग्न दाखवण्यात येणार आहे. यावर मथुरेतील काही संतांनी आक्षेप दर्शवला आहे. महापंचायतीच्या एका बैठकीत चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जीभ हासडून आणणाऱ्याला एक कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. नारायण सिंह यांनी 'टॉयलेट एक प्रेमकथा'चं दिग्दर्शन केलं आहे.
नंदगाव आणि बरसाना या दोन गावातील मुला-मुलींचं एकमेकांशी लग्न न लावण्याची प्रथा आहे. मात्र या चित्रपटात तशाप्रकारचं लग्न लावताना दाखवण्यात येणार आहे. या सीनमुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा बरसाना गावातील महापंचायतीत संतांनी केला. वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरा पायदळी तुडवण्याचा डाव असल्याचं संतांनी म्हटलं आहे.
अक्षयकुमारच्या 'टॉयलेट..' चित्रपटातून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. स्वच्छतेबाबत काळजी न घेणाऱ्या व्यक्तींवर बोचरी टीका करण्यात येत आहे.