मुंबई : 'बाहुबली' सिनेमातील 'कटप्पा'च्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले तामीळ अभिनेते सत्यराज यांचा मेणाचा पुतळा लवकरच लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमध्ये दिसणार आहे. सत्यराज यांचा मेणाचा पुतळा 'कटप्पा'च्या अवतारातच तयार केला जाणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे सत्यराज हे पहिले तामीळ अभिनेते आहेत, ज्यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बसवण्यात येणार आहे.

याआधी 2017 मध्ये बँकॉकच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा 'अमरेंद्र बाहुबली'च्या अवतारातील आहे.

या वृत्तानंतर सत्यराज यांचं कुटुंब अतिशय आनंदात आहे. त्यांच्या मुलाने या बातमीनंतर ट्विटरवर आनंद व्यक्त करत म्हटलं की, हे वाचून आम्हाला अभिमान वाटत आहे.


1978 मध्ये आलेल्या 'सत्तम एन काईल' या सिनेमातून सत्यराज यांनी कमल हासन यांच्यासोबत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी सुमारे 200 तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्येही अभिनय केलं आहे.

बाहुबलीनंतर कटप्पाची व्यक्तिरेखा सर्वात लोकप्रिय झाली होती. सिनेमाचा दुसरा भाग येईपर्यंत सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की, कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा? सोशल मीडियावरही हा प्रश्न ट्रेण्डिंगमध्ये होता.

या व्यक्तिरेखेमुळे सत्यराज यांना जगभरात ओळख मिळाली. बाहुबली त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड सिद्ध झाला.