मुंबई : पान बहारच्या जाहिरातींमध्ये हॉलिवूडचा चेहरा पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले होते. प्रख्यात अभिनेता पियर्स ब्रॉसननला पान बहारच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. मात्र खुद्द ब्रॉसनन या जाहिराती पाहून नाराज आहे.


भारतात आपली प्रतिमा मलीन झाल्याचं पाहून 'जेम्स बाँड'फेम पियर्स ब्रॉसननने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कँसरसारखे आजार निर्माण करणारे घटक पान बहारमध्ये असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं नव्हतं, असं स्पष्टीकरण ब्रॉसननने दिलं आहे.

पान बहारच्या नावाखाली आपली दिशाभूल करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे. 'माझ्यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांची मी मनापासून माफी मागतो. पान बहार कंपनीने माझ्यासोबत केलेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे. फसवून कंपनीने मला त्यांच्या सर्व उत्पादनांचा ब्रँड अँबेसेडर असल्याचं भासवलं आहे.' असं पियर्सने म्हटलं आहे.

माझा फोटो सगळ्या प्रॉडक्ट्सवरुन हटवा, अशी मागणी त्यांनी पान बहार कंपनीकडे केली आहे. त्याचप्रमाणे मी ज्या उत्पादनांची जाहिरात करत होतो, त्यांच्याविषयी मला पूर्ण माहिती दिली गेली नव्हती, असंही कंपनीने जाहीर करावं, असं पियर्स ब्रॉसनन यांनी म्हटलं आहे.

मी कंपनीच्या केवळ एकाच उत्पादनाची जाहिरात करण्याचं स्पष्ट केलं होतं. ते उत्पादन संपूर्ण नैसर्गिक आणि तंबाखू-सुपारी विरहित असल्याचं मला सांगण्यात आलं होतं. संबंधित उत्पादन अपायकारक नसल्यानेच आपण जाहिरात करण्यास होकार दिल्याचं पियर्स ब्रॉसननने म्हटलं आहे.

पियर्स ब्रॉसनन यांनी 1995 ते 2002 या काळात बाँड सीरिजमधले चार चित्रपट केले होते. एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. मात्र पान तंबाखूची जाहिरात स्वीकारल्यामुळे भारतात आपली प्रतिमा नकारात्मक झाल्याचं, त्याने म्हटलं आहे.