'ऐ दिल..'मधल्या 'त्या' संवादामुळे रफींचा अपमान, मुलाचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 01 Nov 2016 09:06 PM (IST)
मुंबई : पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेला करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमातील एका संवादामुळे सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा अपमान होत असल्याचा आरोप रफींचे पुत्र शाहीद रफी यांनी केला आहे. दिग्दर्शक करण जोहरने जाहीर माफी मागावी, तसंच सिनेमातील हा प्रसंग काढून टाकावा अशी मागणी शाहीद रफी यांनी केली आहे. 'मोहम्मद रफी गाते नही, रोते थे' अशा आशयाचा एक संवाद चित्रपटात अनुष्काच्या ओठी आहे. विशेष म्हणजे 'ऐ दिल है मुश्किल' या करण जोहरच्या चित्रपटाचं नावसुद्धा मोहम्मद रफी यांच्याच एका गाजलेल्या गाण्यावरुन ठेवण्यात आलं आहे. 'मोहम्मद रफी हे भारतातील एक महान गायक होते. आज त्यांच्या निधनाला 25 वर्ष उलटूनही त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्यांचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. असं असताना करण जोहरसारख्या दिग्दर्शकानं त्यांचा असा अपमान का करावा' असा सवाल शाहीद रफी यांनी विचारला आहे. ऐन दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. मात्र त्याच्या प्रदर्शनापूर्वी मोठा वादंग निर्माण झाला होता. पाकिस्तानी कलाकार फवाद खानला मनसेने केलेल्या विरोधामुळे आणि नंतर हिरवा कंदील दाखवल्यामुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता.