अदनान सामी आणि त्याचे सहकारी एका कार्यक्रमासाठी कुवेतला गेले होते. रविवारी रात्री हे सर्व जण विमानतळावर उतरले, तेव्हा कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना 'इंडियन डॉग्ज' म्हणजे भारतीय कुत्रे म्हणून चिडवलं. अदनान सामीने ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.
'आम्ही तुमच्या शहरात प्रेम घेऊन आलो होतो. आमच्या भारतीयांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिली, मात्र तुम्ही कोणताही पाठिंबा दिला नाहीत. कुवेत विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विनाकारण माझ्या स्टाफला तुच्छ लेखलं आणि भारतीय कुत्रे म्हणून डिवचलं. भारतीया दूतावासाशी संपर्क करुनही काही फायदा झाला नाही. कुवेतींची इतक्या उद्धटपणे वागण्याची हिंमतच कशी झाली?' असा संताप अदनानने ट्वीटमधून व्यक्त केला आहे.
स्थानिक भारतीय दूतावासाशी संपर्क साधूनही काहीही मदत न मिळाल्याचा दावा अदनानने केला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अदनानच्या तक्रारीची दखल घेत आपल्याशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं. यानंतर काही वेळातच अदनाननं आपल्याला मदत मिळाल्याचं सांगत स्वराज यांचे आभार मानले.
या प्रकारानंतर कुवेत विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत भारतीयांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. यापूर्वीही शाहरुख खान, इरफान खान अशा अनेक भारतीय सेलिब्रेटींना परदेशातील विमानतळावर अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती.
गायक अदनान सामी मूळ पाकिस्तानी वंशाचा असला तरी भारतीय संगीताला दिलेलं योगदान पाहून 2015 मध्ये भारत सरकारने त्याला भारतीय नागरिकत्व दिलं. त्यानंतरही अदनानला टीकेला सामोरं जावं लागलं होतं.