Om Raut On Adipurush Movie : 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा वेगवेगळ्या कारणाने रिलीजच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. देशभरातील सिनेप्रेमी हा सिनेमा पाहून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 'आदिपुरुष' सिनेमाच्या दिल्लीतील स्क्रीनिंगला दिग्दर्शक ओम राऊतने (Om Raut) हजेरी लावली होती. त्यावेळी या सिनेमाच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना ओम राऊत म्हणाला की,"जय श्री राम". 


दिल्लीतील चाणक्यपुरी येथील पीव्हीआरमध्ये दिग्दर्शक ओम राऊतने आणि सिनेमात लक्ष्मणाच्या भूमिकेत असणाऱ्या सनी सिंहने 'आदिपुरुष'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्यावेळी ओम राऊतने सिनेमातील डायलॉगवरुन सुरू असलेल्या वादावर बोलणं टाळलं.


'आदिपुरुष'च्या वादादरम्यान रिपब्लिकला दिलेल्या मुलाखतीत ओम राऊत म्हणाला की,"रामायण हे खूप मोठं आहे. ते सर्वांना समजणे शक्य नाही. जर कोणी म्हणत असेल की मला रामायण समजतं तर ते खोटं बोलत आहेत. छोट्या पडद्यावरील रामायण हे मोठ्या स्तरावरचं होतं. आम्ही 'आदिपुरुष'ला रामायण म्हणत नाही. 'आदिपुरुष' हा रामायणाचा एक छोटासा भाग आहे". 






'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर या सिनेमावर टीका व्हायला सुरुवात झाली होती. त्यावेळी ओम राऊत म्हणालेला,"आदिपुरुष' सिनेमाला नेटकरी ट्रोल करत आहेत याचं वाईट वाटत आहे. पण आश्चर्य वाटत नाही. 'आदिपुरुष' सिनेमा रुपेरी पडद्याचा विचार करुन बनवण्यात आला आहे. पण नेटकरी करत असलेलं ट्रोलिंग मी थांबवू शकत नाही. मोबाईवर पाहण्यासाठी हा सिनेमा नाही. या सिनेमाचा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित करता आला असता तर युट्यूबवर प्रदर्शित केला नसता". 


ओम राऊत पुढे म्हणालेला,"आदिपुरुष' हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. सध्याच्या मुलांना रामायणाबद्दल फारसं माहिती नाही. पण या सिनेमाच्या माध्यमातून त्यांना रामायणाबद्दल थोडी माहिती मिळेल. हा सिनेमा थ्रीडीमध्ये पाहताना तुम्हाला मजा येईल". 


'आदिपुरुष' या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), कृती सेनन (Kriti Sanon), सैफ अली खान (Saif Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 140 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा 200 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.  


संबंधित बातम्या


Adipurush : 500 कोटींचा खर्च, तीन वर्षांची प्रतीक्षा, हजारो कलाकारांची मेहनत.. मल्टिस्टारर 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर पास, पण प्रेक्षकांकडून नापास