Sulochana Latkar: ज्येष्ठ अभिनेत्री  सुलोचना लाटकर  (Sulochana Latkar) यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. सुलोचना दीदींना पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. सुलोचना यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुलोचना दीदींचे अंत्यदर्शन घेतले. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुलोचना दीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,'सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे.त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती.'






मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शोक व्यक्त


राज्यशासनाच्या वतीने सुलोचना दीदींना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले," सुलोचनादीदींचे निधन ही अत्यंत दुःखद, रसिकांच्या मनाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी पोरकी झाली आहे. त्या चित्रपटसृष्टीतल्या मूर्तिमंत वात्सल्य होत्या. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. विशेषकरून त्यांनी साकारलेली ‘आई’ची भूमिका ठसा उमटवणारी ठरली". 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे. सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान आमदार सदा सरवणकर, अभिनेते सचिन पिळगावकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.


सुलोचना दीदी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1946 पासून केली होती. 1946 ते 1961 या काळात सासुरवास (1946), वहिनीच्या बांगड्या (1953), मीठ भाकर, सांगते ऐका (1959), लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारली.  


250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये सुलोचना दीदी  यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 


संबंधित बातम्या


Sulochana Latkar : "सुलोचनादीदींच्या जाण्याने अवघी चित्रपटसृष्टी पोरकी"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं पार्थिवाचे अंत्यदर्शन