अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई
एबीपी माझा वेब टीम | 12 Jul 2019 06:00 PM (IST)
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने मुलीला जन्म दिला. ती वर्देंची बाईक फेम अक्षय वर्दे याची पत्नी आहे
मुंबई : 2019 मध्ये बाळाला जन्म देणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एक भर पडली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई झाली. समीराने आज (12 जुलै 2019) एका गोंडस मुलीला जन्म दिला. 'वर्देंची' बाईक फेम अक्षय वर्दे आणि समीरा रेड्डी हे 21 जानेवारी 2014 रोजी विवाहबंधनात अडकले होते. 24 मे 2015 रोजी त्यांचा पहिला मुलगा हंसचा जन्म झाला. दुसऱ्यांदा गर्भवती असताना समीराने मॅटर्निटी फोटोशूट करुन इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. आपल्या गर्भात मुलगी असल्याचे 'वाईब्ज' मला मिळत आहेत, असं समीरा म्हणालीही होती. तिचा अनुमान खरा ठरल्याचं दिसत आहे. 34 वर्षीय समीराने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन बाळाची झलक दाखवली आहे. 'आमची नन्ही परी आज सकाळी आमच्या आयुष्यात आली. माझी मुलगी. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी आभार' असं कॅप्शन समीराने दिलं आहे. समीराने 2002 साली 'मैंने दिल तुझको दिया' या सोहेल खानसोबतच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर डरना मना है, मुसाफिर, रेस यासारख्या चित्रपटात ती झळकली होती. लग्नानंतर ती मोठ्या पडद्यावर झळकली नाही.