चंदिगढ : निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये अनेकांचं इन्कमिंग सुरु आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिनेही भाजपचा रस्ता धरला आहे. 'हंगामा', 'धूम 2' यासारख्या चित्रपटातून आणि 'बिग बॉस'च्या आठव्या सिझनमध्ये गाजलेली अभिनेत्री रिमीने भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. रिमीसोबतच प्रख्यात अभिनेता सनी देवलही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा पुत्र, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सनी देवलही भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत आहेत. रिमी आणि सनी भाजपच्या तिकीटावर पंजाबमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. सनी देवल गेल्या काही वर्षांमध्ये फारसा मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. मोहल्ला अस्सी, घायल वन्स अगेन हे त्याचे गेल्या वर्षातले सिनेमे.

काहीच दिवसांपूर्वी अभिनेते दलिप ताहिल यांनी भाजपप्रवेश केला होता. शिवाय अनेक बॉलिवूड अभिनेते येत्या काळात भाजपमध्ये येतील, असं भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सांगितलं.

जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल भाजपमध्ये?


गेल्या काही दिवसांमध्ये अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. अर्जुनने पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

काँग्रेसमध्ये गुन्हेगारांना तिकीट, कृष्णा हेगडे भाजपात


पंजाबसह पाच राज्यांमध्ये पुढच्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर अभिनेत्यांनी राजकारणात नवी इनिंग सुरु करण्याची तयारी केलेली दिसते.