मुंबई : आपल्या वेगवेगळ्या अदाकारीने लाखो तरुणांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री मिथिला पालकरचे तिच्या आजी-आजोबांवरील प्रेम सर्वश्रृत आहेच. टिपिकल मराठी असलेल्या या आजी-आजोबांचे जुने फोटो आणि सध्याचा एक व्हि़डीओ सोशल मीडियावर शेअर करत मिथिलाने 'ग्रॅन्ड पॅरेन्ट्स डे'च्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांच्या सहजीवनातून आपण संयम आणि चिकाटी आणि सहनशिलता शिकल्याचं तीनं म्हटलं आहे. मिथिलाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
'रुपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला, मज वेड लावले तू, सांगू नको कुणाला' हे आशा भोसलेंचं गाणं आणि त्यामध्ये आपल्या आजी-आजोबांचे जुने फोटो मिथिलाने शेअर केले आहेत. मिथिला म्हणते की, "आजी-आजोबा हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या सहजीवनातून मला संयम, चिकाटी आणि जगण्यातील रोमान्सचा खरा अर्थ सापडला."
मिथिला पुढे म्हणते की, जर या जगात आजी-आजोबा नसते तर या जगाला काहीच अर्थ नसता. मिथिलाने या आधीही आपल्या आजी-आजोबांचे बरेच किस्से चाहत्याशी शेअर केले आहेत.
आपल्या दिलखेचक अदाकारीसाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मिथिलाने आपल्या अभिनयाची सुरुवात 2014 साली मराठी शॉर्ट फिल्म 'माझा हनीमून' मधून केली होती. ही शॉर्ट फिल्म मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आली होती. मिथिलाने आपल्या 'कारवां' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
मिथिलाला 2016 साली पिच परफेक्ट आणि अन्ना केंड्रिकच्या 'कप सॉन्ग' च्या तिच्या स्वत:च्या व्हर्जनमुळे एक वेगळी ओळख मिळाली. 'तुझी चाल तुरु तुरु' या तिच्या गाण्याला तीन दशलक्ष पेक्षा जास्त प्रेक्षकांनी पाहिलंय. मिथिला युट्यूब वेब सीरीज 'गर्ल इन द सिटी' मध्ये दिसली. यात साकारलेल्या भूमिकेमुळे तिने अनेकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं. ती अनेक मराठी शॉर्ट फिल्म आणि वेब सीरीजमध्ये झळकली आहे. त्यानंतर मिथिला 'लिटल थिंग्ज' या वेब सीरीजमध्ये प्रेक्षकांच्या समोर आली होती. काव्या कुलकर्णी नावाची भूमिका साकारणाऱ्या मिथिलाला यामुळे खूप लोकप्रियता मिळाली.
संबंधित बातम्या :