दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला फरार घोषित करण्यात आलं होतं. यापूर्वीच या प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट बजावलं होतं. मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ठाणे क्राईम ब्रांचनं ममताच्या यारी रोडवरील घरावर नोटीस चिटकवली होती.
काय आहे प्रकरण?
एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं.
कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डीलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डीलरच्या माहितीनुसार ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयुर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या.
या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.
या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले होते.