सोनाली बेंद्रेला किडनॅप करण्याच्या इच्छेबाबत शोएब अख्तरचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2019 03:54 PM (IST)
'मी सोनाली बेंद्रेला कधी भेटलोही नाही, ना मी तिचा चाहता आहे, ना मला कधी तिचं अपहरण करण्याची इच्छा होती' असं म्हणत शोएबने सोनालीसोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
मुंबई : क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या अफेअरची चर्चा जेव्हा होते, तेव्हा रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ख्याती असलेला पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचं नाव समोर येतं. सोनालीने प्रेम नाकारल्यानंतर शोएब अख्तर तिला किडनॅप करण्याच्या बेतात होता, असा किस्सा विश्वचषकाच्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. मात्र खुद्द शोएबनेच एक व्हिडिओ शेअर करत या वृत्ताचा इन्कार केला आहे. 'मी सोनाली बेंद्रेला कधी भेटलोही नाही, ना मी तिचा चाहता आहे, ना मला कधी तिचं अपहरण करण्याची इच्छा होती' असं म्हणत शोएबने सोनालीसोबतच्या कथित अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम दिला. 'सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर झाल्यावर त्यांचा संघर्ष मी पाहिला. त्यांनी ज्याप्रकारे हिंमत दाखवली, ज्या धीराने त्यांनी कर्करोगाचा सामना करुन पुनरागमन केलं, त्यांनी इतरांनाही प्रेरणा दिली. तेव्हा मी त्यांचा चाहता झालो' असं शोएब म्हणाला. 'माझा त्यांच्यासोबत कोणताही संबंध उरलेला नाही. माझ्या खोलीत एकाच व्यक्तीचा फोटो लागलेला असायचा, तो म्हणजे इमरान खान. त्यांच्या शिवाय मी कुठल्याच व्यक्तीला किंवा क्रिकेटपटूला आपला आदर्श मानला नाही' असंही शोएब म्हणतो. 'सोनाली आणि माझ्याबाबत खोट्या अफवा पसरवल्या जात आहे. त्या नुकत्याच आजारातून बऱ्या झाल्या आहेत. आपल्याला त्यांची हिंमत वाढवायला हवी. त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलायला हव्यात. आम्हा दोघांचा विनाकारण संबंध जोडला जात आहे.' असाही दावा शोएबने केला.