मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांच्या जीवनात अशीही स्थिती निर्माण झाली होती, की त्यांनी आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता. अमर सिंह यांना मी राखी बांधली तरी, लोक आमच्या नात्याविषयी चर्चा करणं बंद करणार नाहीत, असं जया प्रदा यांनी म्हटलं.


राष्ट्रीय लोक मंच पक्षाचे अध्यक्ष अमर सिंह यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. मी संकटात असतानाही अमर सिंह धावून आले होते. त्यामुळे मी अमर सिंह यांना गॉडफादर मानते. यावेळी जया प्रदा यांनी एसपी नेता आणि आमदार आजम खान यांच्यावरही गंभीर आरोप केले. आजम खान यांनी माझ्यावर अॅसिड हल्ल्याचा प्रयत्न केला होता.


आझम खान यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणे, अॅसिड हल्ल्याची धमकी, जीवे मारण्याची धमकी अशा कठीण काळातही मी माझी स्थिती कुणाला सांगू शकत नव्हते. घरी जिवंत परत येईल की नाही हे देखील मी आईला सांगू शकत नव्हते, असा अनुभव जया प्रदा यांनी सांगितला.


माझे बनावट (मॉर्फ्ड) अश्लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि त्यावेळी मी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा विचार करत होते. मी संकटात असताना मुलायम सिंह यांनी मला एक फोनही केला नाही. केवळ अमर सिंह यांनी मला आधार दिला, असं जया प्रदा यांनी सांगितलं.


समाजवादी पार्टीतून काढूल टाकल्यानंतर जया प्रदा आणि अमर सिंह यांनी राष्ट्रीय लोक मंच नावाचा पक्ष स्थापन केला.