मुंबई : असिफ बसरा.. अनेक चित्रपटांतून त्यांनी भूमिका वठवल्या. हा चेहरा तमाम भारतीयांना ओळखीचा होता. जब वी मेट, ताश्कंद फाईल्स, ब्लॅक फ्रायडे, परजानिया अशा कित्येक चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांच्या भूमिका भले प्रेक्षकांच्या लक्षात नसतील पण तो चेहरा मात्र प्रेक्षक विसरले नाहीत. कारण त्यात त्यांनी केलेल्या अभिनयाने पाहणाऱ्याच्या मनावर छाप सोडली होती. असिफ यांच्या अकाली आत्महत्येने प्रत्येक जण हळहळला. पण आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा बॉलिवूडवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.


विवेक अग्निहोत्री हे प्रख्यात दिग्दर्शक आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ताश्कंद फाईल्स हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. असिफ यांच्या जाण्याची वेदना त्यांनाही आहे. एकीकडे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हळहळणारं बॉलिवूड असिफ यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हळहळलं. शिवाय, यांचा मृतदेहही असाच गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याने काही काळ शंकेची पालही चुकचुकली होती. पण असिफ यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. आता विवेक अग्निहोत्री यांनी असिफ यांना मिळणाऱ्या वागणुकीवर बोट ठेवलं आहे. विवेक यांच्यासोबत असिफ यांनी ताश्कंद फाईल्स या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. विवेक म्हणाले, "असिफ यांच्यासारख्या गुणी अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये किमान आदराची वागणूकही दिली जात नाही. आपल्याकडे सगळी इंडस्ट्री सुपरस्टार ड्रिव्हन आहे. त्यामुळे असिफसारख्या कुणाही कलाकाराला त्याला मिळायला हवा तेवढा मान, आदर मिळत नाही. त्याची सल असिफच्या मनात होती. चित्रपटावेळी आम्ही अनेकदा या विषयावर बोलत होतो."


बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांची आत्महत्या; कारण अस्पष्ट


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडची काळी बाजू उजेडात आली होती. सुशांतसारख्या नवोदित नायकांच्या वाट्याला येणारी अवहेलना त्यातून दिसली होती. ती गोष्ट जुनी होते ना होते तोवर सुशांतसारखी तरुण फळी अमली पदार्थाच्या आहारी कशी गेली आहे हेही स्पष्ट झालं. त्यात असिफ सारख्या अभिनेत्याने आत्महत्या केल्याने ही बाब केवळ नायकांबाबत नसून अनुभवी आणि दुय्यम, तिय्यम परंतु गुणी कलाकारांच्या वाट्यालाही ही वेदना येते हे विवेक यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होतं. मुंबई आणि इंडस्ट्रीच्या नकारात्मकतेपासून लांब जाण्यासाठीच असिफ यांनी धरमशाला गाठलं असं 'हिचकी'चा दिग्दर्शकही सांगतो.


Actor Asif Batra Suicide | बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांची हिमाचलमध्ये गळफास घेत आत्महत्या