अभिनेता विकी कौशलला सेटवर अपघात, गालाच्या हाडाला फ्रॅक्चर
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2019 01:10 PM (IST)
भानू प्रताप सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी भयपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या सेटवर विकीला अपघात झाला. गुजरातमधील अलंगमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं.
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. साहसी दृश्याचं चित्रीकरण करताना दरवाजा आपटून विकीच्या गालाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके घालावे लागले. भानू प्रताप सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी भयपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या सेटवर विकीला अपघात झाला. गुजरातमधील अलंगमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता, मात्र काही तांत्रिक चुकांमुळे दरवाजा विकीच्या तोंडावर आपटला. त्यानंतर विकीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 'उरी'चा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी कौशल एका अॅक्शनपटात झळकणार आहे. शूजित सरकार यांचा 'उधम सिंग', करण जोहरचा 'तख्त', अश्वत्थामावर आधारित एका चित्रपटातही विकी दिसणार आहे. गेल्या वर्षभरात विकी कौशलने चांगलंच व्यावसायिक यश कमावलं. संजू, उरी : द सर्जिकल स्ट्राईक यासारख्या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवतानाच प्रेक्षकांची वाहवासुद्धा मिळवली. त्यासोबत 'लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेअर फूट' यासारख्या वेब सीरीजही चर्चेत होत्या.