Sumeet Raghavan : अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghavan) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्यक्त होत असतो. गोरेगाव येथील आरे कारशेड प्रकल्पाला सुरुवातीपासूनच त्याने पाठिंबा दर्शवला आहे. आता पुन्हा एकदा त्याने यासंदर्भात एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. 


सुमीतने एक ट्वीट रिट्वीट केलं आहे. एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आंदोलनकर्त्यांना मारताना दिसत आहे. या व्हिडीओला 'फ्रेंचचे नागरिक क्लायमेट चेंज अॅक्टिव्हिस्ट लोकांची काळजी घेताना', असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 






सुमीतने तो व्हिडीओ रिट्वीट करत म्हटलं आहे,"आरेच्या आंदोलकांसोबत आपणही हेच करायला हवं होतं. डोक्यावर चढले होते हे बोगस फालतू लोक..काही कामाचे ना धामाचे". सुमीतने वादग्रस्त ट्वीट करत आरे आंदोलकांची खिल्ली उडवली आहे. 


सुमीतच्या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांसह पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर टीका केली आहे. 'तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून पण नीच आहेस, पर्यावरण हा विषय तुमच्या समजुतीच्या बाहेरचा आहे, आंदोलकांना मारहाण केली पाहिजे हा तुमचा विचार अत्यंत चुकीचा आहे, रंगमंचावर आणि पडद्यावर काम करण्यासाठी डोक्याचा काही वापर नसतो, तुम्हाला सगळे दुसऱ्याने दिलेलेच बोलायचे असते. त्यात स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी असतो. (काही अपवाद जरूर आहेत) अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 








सुमीतने याआधीदेखील आरे आंदोलकांवर निशाणा साधला होता. त्याने ट्विट केलं होतं,"माझ्यासह अनेक मुंबईकरांची अशी मागणी आहे की, आता हा वाद पुरे..मुंबई मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे. कारशेड वहीं बनेगा". 


सुमीतची 'वागळे की दुनिया' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'आपला माणूस', '...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर', 'संदूक' असे सुमीतचे अनेक सिनेमे गाजले आहेत. नुकताच त्याचा 'एकदा काय झालं' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


संबंधित बातम्या


Sumeet Raghavan : सुमीत राघवनची पोस्ट चर्चेत; म्हणाला, 'मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि...'