मुंबई : रंगभूमी आणि मालिकांमध्ये विनोदी व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता संतोष मयेकर यांचं अकाली निधन झालं.
हृदयविकाराच्या धक्क्याने मयेकर यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. भैया हातपाय पसरी, वस्त्रहरण, फू बाई फू सारख्या नाटक-मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.


गेल्या काही महिन्यांपासून संतोष आजारी होते. आज (मंगळवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता त्यांना हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिग्गज अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांचं निधन झाल्यावर 'वस्त्रहरण' या नाटकात त्यांनी तात्या सरपंचाची भूमिका साकारली होती. वस्त्रहरणच्या पाच हजाराव्या प्रयोगातही संतोष मयेकर यांनीच तात्या सरपंच साकारले होते.

भैया हातपाय पसरी, वस्त्रहरण, दोन बायका चावट ऐका, टाईम प्लीज, वार्‍यावरची वरात, मिस्टर नामदेव म्हणे, डॅम्बिस भोळे, ऑल द बेस्ट य‍ा नाटकातल्या त्यांच्या भूमिकाही जबरदस्त गाजल्या होत्या. फू बाई फू या झी मराठीवरील रिअॅलिटी शोमध्ये ते अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत झळकले होते.