मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी सिनेसृष्टीत छाप पाडली होती. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. पण आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक अजरामर सिनेमे केले. पाहा त्यांचे गाजलेले 10 सिनेमे.

1. अर्धसत्य: 1983 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानाती भूमिकेसाठी ओम पुरी यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एक इमानदार पोलिसाची भूमिका त्यांनी साकारली होती. या सिनेमात ओम पुरी यांच्यासह स्मिता पाटीलही होती.

2. जाने भी दो यारो: अनेकदा गंभीर भूमिका साकारणारे ओम पुरी यांनी 'जाने भी दो यारो' या सिनेमातून विनोदी भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी भ्रष्ट बिल्डरची भूमिका निभावली होती.

3. मिर्च मसाला: पुन्हा एकदा स्मिता पाटील आणि नसरुद्दीन शाहा यांच्यासोबत ओम पुरी यांनी मिर्च मसाला या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमाही बराच गाजला होता.

4. आक्रोश: नसीरुद्दीन शहा, स्मिता पाटील आणि ओम पुरी हे त्यावेळी अभिनयातील बादशहा मानले जायचे. 1980 साली आलेल्या आक्रोश सिनेमात ओम पुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. या सिनेमाला उत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

5. आस्था: 1997 साली ओम पुरी आणि रेखा यांचा आस्था हा एक बराच बोल्ड सिनेमा आला होता. या सिनेमात ओम पुरीनं रेखाच्या पतीची भूमिका साकारली होती.

6. तमस: दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या तमस या सिनेमात नाथू ही भूमिका ओम पुरी यांनी साकारली होती.

7. चाची 420: चाची 420 हा सिनेमा भलेही कमल हासन यांच्या अभिनयासाठी ओळखला जात असला तरीही या सिनेमातील असलेल्या छोट्याशा भूमिकेतही ओम पुरी यांनी प्राण ओतले होते. या सिनेमातील त्यांची सेक्रेटरीची भूमिका प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहणारी आहे.

8. माचिस: गुलजार दिग्दर्शित माचिस सिनेमात ओम पुरी यांनी सनातन नावाची भूमिका केली होती. जो खलिस्तानची मागणी करणारा दहशतवादी संघटनेतील होता.

9. ईस्ट इज ईस्ट: बॉलिवूडच नाही तर ओम पुरी यांनी हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. त्यातीलच एक सिनेमा ईस्ट इज ईस्ट यामध्ये त्यांनी जाहिद जॉर्ज खान ही प्रमुख भूमिका साकारली होती. याच सिनेमाचा वेस्ट इज वेस्ट हा सिक्वेलही आला होता. त्यातही ओमपुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता.

10. माय सन दी फनॅटिक: 1997मध्ये ब्रिटिश ड्रामा आधारित सिनेमा सन द फनॅटिक ही एका टॅक्सी ड्रायव्हरची कथा आहे. ज्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे. तरीही तो धर्मनिरपेक्ष आहे. पण जेव्हा त्याचा मुलगा कट्टर इस्लामकडे वळतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतो हेच या सिनेमात दाखवण्यात आहे. या सिनेमात ओम पुरी यांनी परवेजची भूमिका साकारली आहे.