अभिनेते कमल हसन यांच्या घरात आग, सर्व जण सुखरुप
एबीपी माझा वेब टीम | 08 Apr 2017 11:27 AM (IST)
चेन्नई : दिग्गज अभिनेते कमल हसन ऑनस्क्रीन थरारक दृश्य करण्यात पटाईत आहेत. आगीचा असाच काहीसा अनुभव त्यांना रिअल लाईफमध्ये आला. सुदैवाने कमल हसन आगीतून सुखरुप बचावले. कमल हसन यांच्या चेन्नईतील राहत्या घरी मध्यरात्री आगीची किरकोळ घटना घडली. त्यावेळी हसन घरातच होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आगीत कोणालाही दुखापत झालेली नाही. 'माझ्या स्टाफचे आभार. घरात लागलेल्या आगीतून सुखरुप सुटका झाली. फुफ्फुसांमध्ये धूर भरला आहे. तिसऱ्या मजल्यावरुन खाली आलो. मी सुरक्षित आहे आणि कोणालाही दुखापत झालेली नाही' असं ट्वीट त्यांनी केलं आहे. https://twitter.com/ikamalhaasan/status/850467010706321408 'तळमजल्याला आग लागली होती. तिथे एक फ्रीज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीमुळे घरभर धूर पसरला होता' असं कमल हसन यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आलं. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कमल हसनच्या शेजाऱ्यांकडे आग लागल्याचं म्हटलं आहे.