मुंबई : मुंबईत मेट्रो 3 कारशेडसाठी 33 हेक्टरवर पसरलेली झाडं तोडण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय चमत्कारिक आहे, असं मत अभिनेता जॉन अब्राहमने व्यक्त केलं आहे. 'बाटला हाऊस' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजवेळी पाण्याच्या दुर्भिक्ष्यावरुन काळजी व्यक्त करताना जॉनने कारशेडसाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीविषयी भाष्य केलं.

'अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने आरे कॉलनीतील 33 हेक्टरवर पसरलेली हिरवळ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण योग्य दिशेने वाटचाल करत आहोत का, असा प्रश्न मला पडतो. झाडांच्या कत्तलीसह कोस्टल रोडलाही माझा विरोध आहे' असं जॉन अब्राहम म्हणाला.

मेट्रो रेल्वेसाठी आरे कॉलनीतील प्राणी, झाडं आणि रहिवाशांचं विस्थापन करणं अनाकलनीय आहे, असंही जॉन म्हणाला.

जॉनला महाराष्ट्रातील जल परिस्थिती आणि मुंबई पावसामुळे भरणाऱ्या पाण्याविषयीही विचारण्यात आलं. 'आपण पर्जन्य जल संवर्धनात मागे पडत असल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. पाण्याचा साठा व्यवस्थित केल्यास पिण्यायोग्य पाणीही मिळेल, आणि ते रस्त्यावर साठणारही नाही' असं जॉनला वाटतं.

जर पर्जन्यमान सुधारलं नाही, तर येत्या तीस वर्षांत नद्या आटतील. पाण्याची सध्या जी परिस्थिती आहे, त्याहून बिकट होईल. त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे, असं जॉन म्हणतो.

'बाटला हाऊस' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज सोहळ्यासा जॉनसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, नोरा फतेही, दिग्दर्शक निखिल अडवाणी आणि निर्माते भूषण कुमार उपस्थित होते.

पर्यावरणप्रेमी आणि विस्थापितांकडून मुंबई महापालिका आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला आतापर्यंत 82 हजार पत्रं मिळाली आहेत. यामध्ये रणदीप हुडा, दिया मिर्झा, आदिल हुसैन, पूजा बेदी यासारख्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.