Jackie Shroff High Court:  बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने, कामाने स्थान मिळवणारा अभिनेता म्हणून जॅकी श्रॉफला (Jackie Shroff) ओळखले जाते. चाहत्यांच्या जग्गूदादा आपल्या वेगळ्याच अंदाजासाठी ओळखला जातो. त्याची बोलण्याची एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळेच जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा वेगळा ठरतो. जॅकी श्रॉफ हा आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. आता याच शब्दावरून जग्गूदादाने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अभिनेता जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्या खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि 'भिडू' शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. 






जॅकी श्रॉफने म्हटले की, सोशल मीडिया आणि एआय ॲप्सशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो  किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी केली. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेवर आता 15 मे रोजी सुनावणी होणार आहे.  जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेनुसार, पॅरोडी, विडंबनात्मक कलाकृतीसाठी आपला आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर करण्यास मनाई नाही. मात्र,  चुकीच्या गोष्टींसाठी, बदनामीकारक कटेंट तयार करण्यासाठी आपल्या आवाजाचा, व्यक्तीमत्त्वाचा वापर होता कामा नये असे जॅकी श्रॉफने म्हटले. 







अमिताभ बच्चन यांनीही याचिका दाखल केली आहे


जॅकी श्रॉफ हा पहिला अभिनेता नाही ज्याने आपल्या हक्कांबाबत याचिका दाखल केली आहे. याआधी बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या हक्कांबाबत याचिका दाखल केली होती. त्यांनी 2022 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो, नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाशी निगडीत गोष्टी वापरण्यास मनाई करावी अशी मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अंतरिम आदेश जारी केला होता.