मुंबई : बॉलिवूडमधला प्रयोगशील अभिनेता अशी ओळख असलेल्या इरफान खानला एका दुर्धर आजाराने ग्रासलं आहे. काही दिवसांपूर्वी इरफानने आपल्या आजारपणाबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली. त्यानंतर त्याची पत्नी सुतपाने प्रेम आणि सदिच्छांबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.


'माझा बेस्ट फ्रेण्ड आणि जोडीदार हा लढवय्या आहे. अत्यंत नजाकतीने तो प्रत्येक अडथळ्याला सामोरा जात आहे. तुमचे फोन आणि मेसेजेसना उत्तर न देऊ शकल्याबद्दल क्षमस्व. पण मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, की तुमच्या प्रार्थना आणि काळजीमुळे अत्यंत भारावून गेले असून जगभरातील सर्वांची ऋणी आहे.  '

'मलाही लढवय्या केल्याबद्दल मी देव आणि माझ्या जोडीदाराची आभारी आहे. रणभूमीत उतरल्यावर संकटांना कशाप्रकारे तोंड द्यायचं, याकडे माझं लक्ष केंद्रित झालं आहे. हा लढा सोपा नव्हता, नाही आणि नसेल. मात्र कुटुंबीय, मित्र आणि इरफानच्या चाहत्यांनी जो विश्वास निर्माण केला, त्यामुळे मी आशावादी आणि विजयाची निश्चिती वाटते.'

'काळजीतून तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्याचं मी समजू शकते. पण त्याच्या आजाराविषयी विचार करण्यात ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा प्रार्थना करुया. जीवनगाणं, आयुष्याचा नृत्याविष्कार आणि विजय यावर लक्ष केंद्रित करण्याची विनंती करते. माझं कुटुंब लवकरच या आनंदात सहभागी होईल. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.'

- सुतपा इरफान बबिल अयान

इरफान आजारी असल्यामुळे सिनेमाचं शूटिंग पुढे ढकलत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी दिली होती. त्याचवेळी इरफानच्या प्रकृतीबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्याने स्वतःच याबाबत मौन सोडलं. मात्र तरीही चर्चा काही थांबल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या पत्नीने चाहते आणि मित्र परिवाराला शांततेचं आव्हान केलं.



'मी कधीही माझे निर्णय आणि आव्हानांसमोर हार पत्करली नाही. त्यामुळे या परिस्थितीलाही तोंड देईन.' असा आशावाद इरफानने व्यक्त केला होता. 'कुणीही प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, अशी सर्वांना विनंती आहे. डॉक्टर या आजाराच्या निदानापर्यंत पोहचतील, तेव्हा पुढच्या 10 दिवसात मी स्वतःच याबाबत माहिती देईन' असं इरफान म्हणाला होता.

इरफान खानची भूमिका असलेला ब्लॅकमेल हा सिनेमा 6 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित दीपिका आणि इरफानची भूमिका असलेल्या चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. एस हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.

दीपिकाची पाठदुखी आणि इरफानच्या आजारपणामुळे चित्रपटाचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं आहे. इरफान-दीपिकाच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, हीच सदिच्छा.

संबंधित बातम्या :


दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट