मुंबई:  कर्करोगाशी झुंज देत असलेल्या अभिनेता इरफान खानने भावनिक पत्र शेअर केलं आहे. इरफानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर झाला असून त्याच्यावर इंग्लंडमध्ये उपचार सुरु आहेत.


आपल्यावर सुरु असलेले उपचार, तणाव आणि त्रास याबाबत इरफानने पत्राद्वारे आपलं मन मोकळं केलं आहे. हे पत्र टाइम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलं आहे. अत्यंत भावनिक पत्रात इरफान खचल्याचं दिसतं. पण आयुष्याकडे सकारात्मक पाहात असल्याचं त्याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.

काही महिन्यापूर्वी अचानक मला हा आजार झाल्याचं समजलं. ज्या रोगाचं नावच माहित नाही, ते ऐकून मला धक्का बसला, अशी सुरुवात इरफानने केली आहे.

इरफान खानचं वेदनादायी पत्र

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर हे नावच माझ्यासाठी नवीन होतं. या दुर्धर आजाराविषयी फार माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उपचाराची ठोस दिशाही निश्चित नव्हती. मी एव्हाना एका प्रयोगाचा हिस्सा झालो होतो.

आजार होण्याआधी मी एका वेगळ्याच खेळाचा भाग होतो. मी एका अत्यंत वेगात जाणाऱ्या रेल्वे सफारीचा जणू आनंद लुटत होतो. माझ्यासोबत खूप अपेक्षा, स्वप्न, इच्छा, ध्येय होती. त्या पूर्ण करण्यात मी व्यग्र होतो आणि अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी मागे वळून पाहिले तर तो टीसी होता. त्यानं मला सांगितलं...तुम्ही उतरण्याचं ठिकाण आलंय...आता उतरा खाली. आयुष्याचेदेखील असंच असतं जीवनरुपी महासागरातत तुम्ही पाण्याच्या थेंबासारखे असता.

मला होणाऱ्या वेदना भयंकर आहेत. त्यावेळी फक्त आणि फक्त तीव्र वेदना जाणवतात. संपूर्ण विश्व त्या क्षणी एक होतं आणि फक्त एकच गोष्ट तीव्रतेने जाणवत असते, ती म्हणजे वेदना. ज्या रुग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत, त्याच्यासमोर लॉर्ड्स स्टेडियमची मागची बाजू दिसते. मला जाणवणाऱ्या वेदनांमध्ये विव्हियन रिचर्ड्सचा हसऱ्या चेहऱ्याचा पोस्टर मला दिसला. पण ते जग माझं राहिलंच नाही असं वाटू लागलं. जीवन- मरणाच्या या खेळामध्ये फक्त एकच मार्ग आहे. एका बाजूला रुग्णालय आणि दुसऱ्या बाजूला स्टेडियम. कुठेच कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आणि हीच गोष्ट माझ्या मनाला खूप लागली. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता.

हेच मला त्यावेळी जाणवलं. माझी ताकद काय आहे, शक्ती काय आहे हे ओळखून हा खेळ अधिक चांगल्या प्रकारे खेळणं, इतकंच काय ते आता माझ्या हातात राहिलं आहे.

जगभरात अनेक मंडळी माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. त्यापैकी अनेकांना तर मी ओळखतसुद्धा नाही. परंतु, या प्रार्थनांच्या जोरावर आज मी या लढाईसाठी तयार आहे. तुमच्या प्रार्थना मला लढण्यासाठी उर्जा देतात. - इरफान खान

संबंधित बातम्या  

इरफानच्या आजारपणावर पत्नीची फेसबुक पोस्ट 


अभिनेता इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर  

दुर्धर आजाराने इरफान खानला ग्रासलं, सोशल मीडियावर पोस्ट