मुंबई : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा अयानने कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराविरुद्धची लढाई जिंकली आहे. अयान आता कॅन्सरपासून पूर्णत: मुक्त झाला आहे. ही बाब शेअर करताना इम्रान हाश्मीने मुलाचे अनेक फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि सगळ्यांचे आभार मानले.


मुलगा अयान कॅन्सरपासून मुक्त झाल्याची माहिती इम्रानने सोमवारी एका ट्वीटद्वारे सगळ्यांना दिली. त्याने लिहिलं आहे की, "आज, पाच वर्षांनंतर अयान कॅन्सरमुक्त झाल्याचं घोषित झालं आहे. हा एक प्रवास होता. तुमच्या प्रार्थना आणि आशीर्वादासाठी खूप आभार. कॅन्सरशी लढणाऱ्यांना प्रेम आणि प्रार्थना आहेच. आशा आणि विश्वास कायम ठेवा, हा रस्ता मोठा आहे, पण एक दिवस तुम्ही ही लढाई नक्कीच जिंकाल."


अयानचा जन्म 2010 मध्ये झाला होता. अयान हा इमरान आणि त्याची पत्नी परवीन शाहनी यांचं पहिलं अपत्य आहे. 2014 मध्ये वयाच्या चौथ्या वर्षी अयानला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. अयानच्या किडनीमध्ये कॅन्सरचा ट्यूमर होता. त्याला पहिल्या स्टेजचा कॅन्सर होता.

कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि आपली कहाणी शेअर करण्याच्या उद्देशाने इम्रान हाश्मीने  'द किस ऑफ लाईफ: हाऊ अ सुपरहीरो अँड माय सन डिफेक्टेड कॅन्सर' हे पुस्तक लिहिलं. यात त्याने अयानचा जन्म, त्याला झालेला कॅन्सर आणि त्याच्यावरील उपचारांबाबत लिहिलं आहे.

मागील काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेकांना कॅन्सरचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी सुरुवातीलाच इरफान खानच्या कॅन्सरच्या वृत्ताने सगळ्यांना धक्का बसला होता. तर अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही कॅन्सरचं निदान झालं. अशा परिस्थितीत अयान बरा झाल्याच्या वृत्ताने इम्रान हाश्मी आणि त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शिवाय कॅन्सरशी लढणाऱ्यांना बळही मिळालं आहे.