चेन्नई: साऊथचा सुपरस्टार अभिनेता धनुष सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. तामिळनाडूमधील एका वयोवृद्ध जोडप्यानं आपणच धनुषचे खरे आई-वडील असल्याचा दावा केला आहे.
थिरुप्पुवनम गावातील कथिरेसन आणि मीनाक्षी यांनी धनुष आपला मुलागा असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी या जोडप्याने दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
धनुष हा रजनीकांत यांचा जावई आहे. धनुषने दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द कऱण्याची मागणी चेन्नई हायकोर्टात केली आहे.
दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर, न्यायाधीशांनी कथिरेसन आणि मीनाक्षी या दाम्पत्याला त्यांचं म्हणणं मांडण्यास सांगून, पुरावे सादर करण्यास सांगितलं. याबाबतची सुनावणी आता 8 फेब्रुवारीला होणार आहे.
धनुष हा आपला तिसरा मुलगा आहे. आमच्या उदरनिर्वाहासाठी त्याने आम्हाला महिन्याला 65 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी दाम्पत्याने आपल्या याचिकेत केली आहे.
धनुष शाळेत असताना लहानपणीच घर सोडून पळाला होता. चेन्नईत जाऊन सिनेजगतात काम करण्यासाठी त्याने घर सोडलं होतं. आम्ही शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र सिनेमामध्ये दिसल्यानंतर आम्ही त्याला ओळखलं, असंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
मात्र धनुषने हा सर्व दावा फेटाळला आहे. त्यासाठी त्याने चेन्नई हायकोर्टात धाव घेत, दंडाधिकारी न्यायालयातील याचिका रद्द करण्याची मागणी केली आहे.