मुंबई : मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स यासारख्या चित्रपटातील तिरसट मात्र विनोदी व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते बोमन इराणी सध्या आजारी आहेत. स्लीप डिस्कच्या त्रासामुळे सध्या ते व्हिलचेअरचा वापर करत असल्याचा फोटो समोर आला आहे. बोमन इराणी यांनी हैदराबादहून परतल्यानंतरचा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. जेट एअरवेजला टॅग करुन त्यांनी श्रीनिवास आणि हुसैन या केबिन क्रूचे आभार व्यक्त केले आहेत. 'मोठ्या कालावधीनंतर विमानाने प्रवास केला. आत्मविश्वास मिळाला. जेट एअरवेजच्या महिला कर्मचारी माया, अनामिका, एलिझाबेथ यांच्यासह जयेश, सचिन आणि गणेश यांचे आभार' असं त्यांनी आधीच्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. फोटो पाहून बोमन यांच्या चाहत्यांनी काळजीपोटी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तेव्हा आपल्याला स्लीप डिस्कचा त्रास असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे चालता-फिरताना आणि कामं करतानाही त्यांना त्रास होत आहे. चाहत्यांनी त्यांना चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना व्यक्त केल्या. 58 वर्षीय बोमन इराणी यांची अभिनयाची कारकीर्द काहीशी उशिराच सुरु झाली. लहानपणी ते डिस्लेक्सियाने त्रस्त होते. पदवीधर झाल्यावर त्यांनी ताज महल पॅलेसमध्ये दोन वर्ष वेटर आणि रुम सर्व्हिसचं काम केलं. नोकरी सोडल्यावर 14 वर्ष ते कुटुंबाचं दुकान सांभाळत होते. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला मुन्नाभाई एमबीबीएस हा त्यांचा पहिला चित्रपट. थ्री इडियट्स चित्रपटात त्यांनी साकारलेली वायरस अर्थात वीरु सहस्रबुद्धेची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. त्याशिवाय लगे रहो मुन्नाभाई,  वीर-झारा, नो एन्ट्री, डॉन, दोस्ताना, कम्बख्त इश्क, हाऊसफुल, कॉकटेल, हॅपी न्यू ईयर, परमाणू आणि संजू यासारख्या अनेक चित्रपटात ते झळकले.