मुंबई: मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासरावला एका टोळीने लाखोचा गंडा घातला आहे. स्वत: अनिकेतने फेसबुकवर लाईव्ह येऊन आपली हतबलता व्यक्त केली.

या टोळीने मदतीच्या नावे लाखो रुपये उकळून, पळ काढल्याचं अनिकेतने म्हटलं आहे.

एक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केसांचा मुलगा या टोळीत आहे. ही टोळी सावज हेरुन, त्यांना भेटतात, त्यांच्याकडे मदतीसाठी याचना करतात. कधी स्वयंसेवी संस्था, तर कधी कॅन्सरग्रस्तांना मदत अशी विविध कारणं देत, ते पैसे उकळतात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा, असं आवाहन अनिकेतने केलं आहे.

अनिकेत विश्वासरावने फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हटलंय?

मी अतिशय उद्विग्न झालो आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्याबाबत जे घडतंय ते तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी फेसबुक लाईव्ह करत आहे. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हा माझा हेतू आहे.

आजकाल लोक एनजीओ, म्युचअल फंड इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली, कॅन्सर पीडित पेशंटच्या मदतीसाठी लोक भेटतात. पण आपल्याला कळत नाही की त्यांचा नेमका हेतू काय आहे. आपण त्यात अडकत जातो. पैशाचं नुकसान होतं, पण भावना दुखावल्या जातात, माणुसकीवरचा विश्वास उडतो, असंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं आहे.

मी याला बळी पडलो आहे, काही लाखांचा गंडा पडला आहे. माझ्या बाबतीत जे झालं, ते तुमच्या बाबतीत होऊ नये, तुम्ही सतर्क राहा, यासाठी मी लाईव्ह करत आहे.

एक टोळी आहे, जी अजूनही सक्रीय आहे. ते बळीचा बकरा शोधून, त्याला गंडा घालतात. ते तुम्हालाही भेटू शकतात, गंडा घालण्याचा प्रयत्न करु शकतात. त्यामुळे सक्रीय राहा.

एक मुलगी, एक मध्यमवयीन पुरुष आणि एक कुरळ्या केसांचा मुलगा या टोळीत आहे. त्यांनी माझ्याकडून फोन नंबर घेऊन काहींशी संपर्कही साधला आहे. माझं फेसबुक हॅक करुन मेसेजही केले आहेत.

चिन्मय मांडलेकर, प्रियदर्शन जाधव यांनी मला याबाबतची कल्पना दिली. मी पोलिसांशी संपर्क केला असून, तपास सुरु आहे.

मी जसा लुबाडला गेलो, तसं तुम्ही लुबाडलं जाऊ नका, हे आवाहन करण्यासाठी मी अचानक फेसबुकवर लाईव्ह आलो आहे. मी काही दिवस सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नसेल.

याप्रकरणाच्या तपासाबाबत मला काही माहिती मिळाली, तर मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह येऊन माहिती देऊन. तुम्ही सतर्क राहा, काळजी घ्या.

VIDEO: