मुंबई : प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि संगीतकार अली जफरविरोधात पाकिस्तानी गायिकेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. अलीने आपल्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा दावा पीडित गायिकेने केला आहे. अली जफरने मात्र ट्विटरच्या माध्यमातून आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.

'मी एका तरुण मुलाचा आणि मुलीचा पिता आहे, एका महिलेचा पती आहे आणि एका आईचा मुलगा आहे. आतापर्यंत टीका, बदनामी किंवा अन्यायाविरोधात स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी किंवा सहकाऱ्यांसाठी अनेकवेळा खंबीरपणे उभा राहिलो आहे.' असं अली जफरने म्हटलं आहे.

'तिच्या आरोपांविरोधात इथे कुठलेही प्रतिदावे करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई करण्याचा आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तर देण्याचा निर्णय मी घेतला आहे.' असंही अलीने ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे.


संबंधित पाकिस्तानी गायिकेने ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. 'माझी सदसदविवेकबुद्धी मला आणखी शांत बसू देत नाही. माझा लैंगिक अत्याचाराचा अनुभव मी शेअर केल्यास आपल्या समाजातील शांत बसण्याची वृत्ती संपेल, असं मला वाटतं. आवाज उठवणं सोपं नसतं. पण शांत बसणं आणखी कठीण असतं.' असं तिने ट्वीट केलं आहे.

अली जफरने 'तेरे बिन लादेन' (2010) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर मेरे ब्रदर की दुल्हन, चष्मेबद्दूर, टोटल सियापा, किल दिल, तेरे बिन लादेन : डेड ऑर अलाईव्ह या सिनेमात काम केलं आहे.