Majhya Vedya Mana: वेड्या मनास कोणतेच भान नसते असे म्हणतात. प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे हे मन वेड्यासारखे भटकत असते. प्रेमाची परिभाषा समजून घेत, याच प्रेमाची अबोल भाषा दर्शवणारे एक नवेकोरे रोमँटिक गाणे प्रेमीयुगुलांच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे मालिका विश्वातून तरुणाईच्या काळजाचा ठोका चुकवणारा 'बॉस माझी लाडाची' फेम मिहीर म्हणजेच सर्वांचा लाडका अभिनेता आयुष संजीव (Aayush Sanjeev) 'माझ्या वेड्या मना..' (Majhya Vedya Mana) या गाण्यातून पुन्हा एकदा तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनणार हे मात्र नक्की. या गाण्यात आयुष सोबत अदिती सुनील, सौम्या वर्मा, गणेश ढोलम हे कलाकार पाहायला मिळत आहेत.
प्रेम आणि मैत्रीची अबोल परिभाषा नेमकी काय आहे आणि या अबोल परिभाषेत हे वेडे मन कसे गुंतत जाते, हे या 'माझ्या वेड्या मना..' गाण्यातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आले आहे. 'माझ्या वेड्या मना...' गाण्याची ही हटके लव्हस्टोरी नक्कीच प्रेमी युगुलांच्या दिलाचा ठाव घेईल यात शंकाच नाही.
पाहा गाणे :
या गाण्यात एक छानशी प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप फिरण्यासाठी बाहेर पडला आहे. तर, वाटेतच त्यांची गाडी बंद पडली आहे. मात्र, आता याच प्रवासात त्यातील एका जोडीला त्यांच्या मनातील अव्यक्त भावना व्यक्त करायच्या आहेत. सुंदर निसर्ग, गुलाबी हवा यांच्या सानिध्यात ते दोघे न बोलताच एकमेकांवरील प्रेम व्यक्त करणार आहेत. या गाण्यातील सुंदर लोकेशन्सनी गाण्याला चार चाँद लावले आहेत.
'अक्षर पिक्चर्स अँड प्रॉडक्शन' निर्मित, 'खाबडे अँड सन्स मीडिया प्रा.लि' अँड 'श्वेता आर्टस्' प्रस्तुत या रोमँटिक गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि पटकथेची दुहेरी धुरा अनिकेत शिरीष खाबडे याने पेलवली आहे. तर, निर्माते तुषार वाघमारे, निलेश जठार, प्राजक्ता बचाव यांनी गाण्याच्या निर्मितीची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. गाण्याच्या संगीताची जबाबदारी ऐश्वर्य मालगवे यांनी सांभाळली असून, गाण्याचे बोल तुषार वाघमारे यांनी शब्दबद्ध केले आहेत. या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यातून आयुषचे अभिनयासह नृत्यकौशल्यही पाहायला मिळत आहे. नृत्याची उत्तम जाण असल्याने या गाण्याच्या कोरीयोग्राफीची संपूर्ण जबाबदारी आयुषने स्वतः सांभाळली आहे. हे गाणे आता प्रेमी युगुलांच्या वेड्या मनाचा ठाव कसा घेणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :