साराला अनुष्काच्या सिनेमाची ऑफर नाकारावी लागली!
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2017 11:06 AM (IST)
केदारनाथ पुढच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर सिनेमाचं शूटिंग जूनमध्ये संपणार आहे
मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पहिला सिनेमा रीलिज होण्यास वर्षभराचा कालावधी असला, तरी सारा इतर सिनेमे साईन करण्यास उत्सुक आहे. परंतु दिग्दर्शक अभिषेक कपूरने तिच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी साराला विचारणा झाली. सारासोबत तिची आई अमृता सिंगही या ऑफरमुळे आनंदात होती. दोघींनाही अनुष्काचा प्रोजेक्ट साईन करण्याची इच्छा होती, मात्र अभिषेकने त्यात मोडता घातला. साराच्या पदार्पणाबाबत फक्त चाहतेच नाही, तर इंडस्ट्रीतही उत्सुकता आहे. कायपोछे फेम दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या केदारनाथमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत सारा झळकणार आहे. केदारनाथ पुढच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं शूटिंग जरी जूनमध्ये संपणार असलं, तरी दुसरा सिनेमा स्वीकारल्यास साराचं लक्ष विचलित होईल, असा अभिषेकचा कयास आहे. त्यामुळेच साराने अनुष्काच्या सिनेमाला नम्रपणे नकार दिला.