Abhijeet Bhattacharya On Amitabh Bachchan : बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. मागील वर्षी त्याने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानवर निशाणा साधला होता. शाहरुख खान (Shahrukh Khan) हा स्वार्थी असून स्वत:च्या कामासाठी लोकांचा वापर करत असल्याचा आरोप अभिजीतने केला होता. आता त्याने नाव न घेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय स्वत:ला 'खरा देशभक्त' म्हणवून घेतले आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारांची देशभक्ती हा ढोंगीपणा असल्याचे त्याने म्हटले.
गायक अभिजीतने 'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, बॉलिवूडमध्ये देशभक्तांची संख्या कमी आहे. याच मुलाखतीत त्याने नाव न घेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला.
देशभक्त असल्याने इंडस्ट्रीत स्ट्र्गल करावा लागला
अभिजीतने म्हटले की, मी देशभक्त असल्याने इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला. माझ्या मूर्खपणावर आजही हसतो. माझ्या चुकांसाठी माझ्याकडे फक्त एक ओळ आहे - देशभक्त असल्याचे भासवा, परंतु प्रत्यक्षात एक होऊ नका. काही दांभिक देशभक्त आहेत ज्यांना याचा मोबदला मिळतो, तर या सिनेइंडस्ट्रीत फक्त मी देशभक्त असल्याचे परिणाम मला भोगावे लागत आहेत असेही त्याने म्हटले.
बॉलिवूडमध्ये सच्चा देशभक्तांची कमतरता
अभिजीतने आपल्या मुलाखतीत म्हटले की, बॉलिवूडमध्ये सच्चा देशभक्तांची कमतरता आहे. सिनेइंडस्ट्रीमधील दुटप्पी भूमिकांचांही त्याने उल्लेख केला. त्याने नाव न घेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यावरही निशाणा साधला. अभिजीतने म्हटले की, एक व्यक्ती काही वक्तव्य करतो आणि दुसरी व्यक्ती ती गोष्ट नाकारते, विशेषत: राजकीय भूमिकांबाबत हे होत असते.
नवरा राम मंदिरात आणि त्याची पत्नी संसदेत काहीही बडबड करते...
अभिजीतने म्हटले की, बॉलिवूडमध्ये खरा देशभक्त नाही. इथे नवरा काहीतरी बोलतो आणि त्याची बायको संसदेत जाऊन त्याच गोष्टींची खिल्ली उडवते. येथे कोणी रामलल्लाचे दर्शन घेणार आहे, तर एका विशिष्ट पक्षाशी संबंधित त्यांची पत्नी प्रभू रामांवर टीका करत आहे. त्यामुळे मी म्हणेन की पैसे देऊन कुणालाही देशभक्त बनवू नका. या कारणाने माझे खूप पैसे आणि बरेच काही गमावले असे अभिजीतने म्हटले.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात अमिताभ यांची उपस्थिती
अभिजीतने उघडपणे कोणाचेही नाव घेतले नाही, पण त्याचा संदर्भ थेट अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशी होता. यावर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा अमिताभ बच्चन या सोहळ्याला उपस्थित होते. तर त्यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांची अनुपस्थिती होती.